पाचपुतेंचं राजकारण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासारखे ; टीका करताना आ.जगतापांचा तोल ढासळला

टीम महाराष्ट्र देशा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहुल जगताप आणि भाजप नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आला आहे. आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे राजकारण बाजीराव मस्तानी चित्रपटासारखे आहे, असा आरोप केला आहे.

या आरोपाबाबत भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लेखी पत्र पाठवून आपल्या आमदारांना आवर घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान तिसरी आघाडी मैदानात असल्याने श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. सेनेच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत आहे.

तर “मी काही कोणाचे नाव घेऊन बोललो नाही. चित्रपटाचे नाव घेऊन बोललो. कोणाची बदनामी करण्याचा माझा उद्देश नव्हता. जर कोणाला माझे शब्द जिव्हारी लागले असतील तर माझाही नाईलाज आहे.” असं स्पष्टीकरण आमदार जगतापांनी दिल आहे.

दरम्यान, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मला उमेदवारी दिली आहे. प्रचारात आ. जगताप यांनी वरील विधान करून महिला वर्गाचा अपमान केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महिलांचे सक्षमीकरण,सबलीकरण व महिलांचा मान सन्मान वाढविण्यासाठी सकारात्मक भूमिका मांडली आहे. अशा स्थितीत आ. जगताप यांनी केलेले विधान नक्कीच शरद पवार यांना खटकणारे आहे. तुम्ही आपल्या आमदाराला या विधानावर समज देण्याची गरज आहे.