राष्ट्रवादीला मोठा धक्का ; शाहापूरच्या आमदाराचा राजीनामा, लवकरच बांधणार शिवबंधन

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. बरोरा हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचा दारूण पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप किंवा सेनेत्त प्रवेश केला आहे. याचदरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, दरम्यान ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळी उपस्थित होते.

पांडुरंग बरोरा हे येत्या काळात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावरच आमदाराचा राजीनामा हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो.