उद्धव ठाकरेंच्या कणकवलीतील सभेला भाडोत्री गर्दी ?

udhav thackeray rally at kankavli

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून सभांचे आयोजन केले जात आहे. प्रमुख नेत्यांच्या सभांना गर्दी जमवण्यासाठी लोकांची जमवाजमव करताना कार्यकर्ते हैराण होताना दिसत आहे. यामध्ये आता कणकवलीत झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला भाडोत्री गर्दी आणल्याची टीका, आ नितेश राणे यांनी केली आहे. पुरावा म्हणून त्यांनी एक व्हिडिओही ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांच्या सभेचे कणकवलीमध्ये आयोजन करण्यात आले होते, यावेळी विरोधकांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ठेचून काढू असा इशारा ठाकरे यांनी दिला होता. तसेच नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली होती.

दरम्यान, कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे घेण्यात आलेल्या सभेला मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरीवरून लोक आणल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे. तसेच एका अमराठी तरुणाने मुंबईतून ५० गाड्या घेऊन सभेला आलो आहे, असे सांगितल्याचा दावा राणे यांनी केला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून खा विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमानकडून निलेश राणे, तर कॉंग्रेसकडून वीनचंद्र बांदिवडेकर अशी लढत होत आहे.Loading…
Loading...