भाजपा प्रणित औषध विक्रेत्यांच्या संघटनेचा ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात एल्गार…

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय जनता पक्ष प्रणित अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने एका बैठकीचे आयोजन काल करण्यात आले होते.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात लढा तीव्र करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले.

सध्या ऑनलाइन व्यवसाय तेजीत आहे.ग्राहकांना घर बसल्या सर्व वस्तू अगदी सहज उपलब्ध होत आहेत.त्याच धर्तीवर गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन औषध विक्रीचा व्यवसायही तेजीत आहे.कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना,कुठलेही नियम न पळता सर्रासपणे ऑनलाईन औषध विक्री करण्यात येत आहे.बऱ्याचदा याचा गैरवापर होताना दिसत असून बंदी असणारी औषधे,उत्तेजक औषधे आणि चक्क ड्रग्स ही या व्यवसायाआडून विक्री होत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे.या ऑनलाईन विक्रीवर शासनाचे कसलेही नियंत्रण नसल्याने अनेकदा लहान मुले,तरुण आरोग्यास घातक अशी ओषधे घरपोच मागवतात त्यामुळे ती अगदी सहजगत्या उपलब्ध होतात.त्यामुळेच समाजस्वाथ्याच्या दृष्टीने ऑनलाइन औषध विक्री अत्यन्त घातक असून शासनाने तात्काळ यावर लगाम घालावा अशी सर्वानुमते मागणी या बैठकीत उपस्थित असणाऱ्या औषध विक्रेत्यांनी केली.काही औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी या विरोधात येत्या 28 सप्टेंबर रोजी आपली दुकाने बंद ठेऊन शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.मात्र आमदार नरेंद्र पवार यांनी याला कडाडून विरोध दर्शविला आहे.

ऑनलाईन औषध विक्री च्या विरोधात लढा योग्य आहे.मात्र औषधे ही अत्यंत जीवनावश्यक वस्तू आहे.औषधे ही जीवन मरणाचा प्रश्न असल्याने आपली दुकाने बंद ठेवली आणि एखाद्या रुग्णास तातडीचे औषध मिळाले नाही तर त्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळणे अयोग्य असल्याचे परखड पणे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.एखादा बंद असेल किंवा एखाद्या ठिकाणी ताणावाचे वातावरण असेल किंवा अगदी दंगलसदृश्य स्थिती असेल तेव्हाही औषधविक्रीची दुकाने सुरू असतात कारण ही अत्यंत तातडीची आणि जीवनावश्यक महत्वाची अशी सेवा आहे.त्यामुळेच औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेऊ नये असे आवाहन आमदार नरेंद्र पवार यांनी केलं.आज राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे.त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघेल.या प्रश्नी औषध विक्रेत्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण या लढाईत सामील असल्याचा विश्वासही त्यांनी औषध विक्रेत्यांना दिला.लवकरच या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची भेट घेणार असल्याचंही आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केलं.

आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसम्पर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय सहअध्यक्ष तुषार मोरे,जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल महाडिक,विनीत मोरे,प्रताप टुमकर आणि डॉ.श्याम पोटदुखे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि औषध विक्रेते उपस्थित होते..
दरम्यान आमदार नरेंद्र पवार यांनी दुकाने बंद न ठेवण्याच्या केलेल्या आवाहनाला औषध विक्रेत्यांनीही प्रतिसाद दिला असून अंबरनाथ केमिस्ट असोसिएशनने या लढ्यात सामील होऊन दुकाने बंद न ठेवण्याचे निश्चित केले आहे..