लक्ष्य २०१९ : कल्याणमध्ये फिर एक बार – नरेंद्र पवार ?

टीम महाराष्ट्र देशा/विकास वाघमारे : महाराष्ट्राचे राजकारणात बरेच बदल घडत असताना कल्याण पश्चिममध्ये मात्र वातावरण वेगळं पाहायला मिळतंय. ठाणे जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा आणि काही विधानसभा सोडल्या तर अजूनही आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला केला. आनंद दिघे यांच्या मृत्युनंतर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर मधल्या पडझडीत मनसेची लाट आली आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश भोईर आमदार म्हणून निवडून गेले. त्यांनतर मात्र भारतीय जनता पार्टीचे वर्तमान आमदार नरेंद्र पवार यांनी २०१४ ला आपली जागा भक्कम केली आहे.

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातून शिवसेनचे १८ तर भाजपाचे २ नगरसेवक असं पक्षीय बलाबल असतानादेखील आमदार नरेंद्र पवार यांनी कडवी झुंज देत आमदारकीची माळ आपल्या गळ्यात घातली. महाविद्यालयीन जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सक्रीय आणि त्यांनतर महाराष्ट्र प्रदेश मंत्री आणि सात वर्षे पूर्णवेळ असं तावून सुलाखून निघालेलं व्यक्तिमत्व पुढं भाजपचा नगरसेवक, उपमहापौर ते थेट आमदार पदापर्यंत प्रवास वाखाणण्याजोगा आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून विजय उर्फ बंड्या साळवी, मनसेकडून तत्कालीन आमदार प्रकाश भोईर, कॉंग्रेसकडून सचिन पोटे, राष्ट्रवादीकडून संजय पाटील आणि भाजपाकडून नरेंद्र पवार अशी पंचरंगी लढत झाली. नगरसेवक आणि उपमहापौर असताना केलेले उल्लेखनीय काम आणि संघटनशक्तीच्या जोरावर मात्र सर्वांना चीत करत नरेंद्र पवार यांनी विजय मिळवला. मनसेची लाट असताना मनसेचे प्रकाश भोईर आमदार झाले असले तरी त्यांना आपले वर्चस्व कायम ठेवता आले नाही. शिवसेनेला अंतर्गत वादाचा फटका म्हणजे हातची आमदारकी सोडावी लागली. त्यांनतर राज्य आणि केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर भाजपाचे जिल्ह्यासह कल्याण पश्चिममध्ये वाढते वजन अबाधित आहे.

दरम्यान जालनासारख्या दुष्काळी भागात जाऊन तब्बल ५५१ जोडप्यांचा मोफत विवाह सोहळा आणि जलयुक्त शिवाराची कामे केली होती. त्यांनतर त्यांना प्रदेश भाजपाने युवा मोर्चाचे प्रभारी करत प्रदेश भाजपाचे सचिव म्हणूनही जबाबदारी दिली आहे. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मात्र भाजपाने चांगलीच तयारी सुरु केली आहे. शिवसेनेचा उमेदवार ठरला नसला तरी कार्यक्रम, उत्सव आणि संघटन बांधणीवर भर देणे सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अजून २०१९ साठी इतकी तयारी करताना कल्याण पश्चिममध्ये दिसून येत नाही. तर मनसेचे इंजिन रुळावर यायला अवकाश आहे.

आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या आमदारकीच्या चार वर्षात मात्र कल्याणकरांशी आपली नाळ घट्ट जोडली आहे. रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून २१ हजार महिलांनी सहभाग घेतला, रक्षाबंधन कार्यक्रमात ५ हजार भगिनी राखी बांधली. घरगुती गणपती दर्शनच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी १ हजार घरी थेट संपर्क केला आहे. ५७ हजार वृक्षारोपण सोहळा करत सामाजिक बांधिलकी जपली तर विद्यार्थी गुणगौरव सोहळा, हस्ताक्षर स्पर्धा, रोजगार मेळावा, मोफत पोलीस प्रशिक्षण अशा सर्वसमावेशक कार्यक्रमासोबतच रिक्षाचालक विमा, विधवा पेन्शन विमा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पावणे चार कोटी रुपयांचा निधी गरजू रुग्णांना मिळवून दिला आहे. कल्याणच्या विकासासाठी कोट्यावधी रुपये आणत त्यांनी कल्याणकरांना विकासाचा अजेंडा दाखवला असल्याचे बोलले जाते.

शिवसेनेचे नगरसेवक सर्वाधिक असल्याने शिवसेनेची हक्काची विधानसभा असल्याचे बोलले जात होते मात्र आता आपल्या कामाच्या जीवावर कल्याण पश्चिमचा गड भाजपाचाच कायम राहणार असं चित्र आजच्या घडीला निर्माण झाले आहे. नरेंद्र पवार यांनी आपल्या संघटन कौशल्याचा खुबीने वापर करत सर्वपक्षीयांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. राजकीय विरोधक कमी असल्याने आणि आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघात नागरिकांसोबत थेट संपर्क ठेवणाऱ्या नरेंद्र पवार यांना २०१९ इतकी आव्हानात्मक नसेल अशीच काहीशी स्थिती आज पाहायला मिळत आहे. सकाळी ६ पासून रात्री २- ३ वाजेपर्यंत पायाला भिंगरी लावून प्रवास करण्याचा सपाटा आमदारांनी लावला आहे. कोणत्याही कार्यक्रमात नरेंद्र पवार यांची उपस्थिती सामान्य कल्याणकरांना दिसतेच. इतकेच नाही तर कोणताही बडेजाव न करता कधी बुलेटवर तर कधी कुणाच्याही मोटारसायकलवर बसून फिरणारा लोकप्रतिनिधी सामन्य कल्याणकरांना भुरळ घालणारा ठरतो आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचार केल्यास शिवसेना आणि मनसेला नरेंद्र पवार आणि भाजपा हे मोठं आव्हान असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व गोष्टींचा विचार करत कल्याण लोकसभेचे प्रभारी म्हणूनही नरेंद्र पवार यांची नियुक्ती केली आहे. लोकसभा मतदारसंघासाठी प्रभारी पदी निवड झाल्यावर झंझावाती प्रवास सुरु केला आहे. युती होवो अथवा नाही याची चिंता न करता प्रामाणिकपणे कामाचा सपाटा नरेंद्र पवार यांनी मतदारसंघात लावला आहे. बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांचे नियोजनही अंतिम टप्प्यात आहे. कल्याण पश्चिमवर पुन्हा भाजपाचाच झेंडा फडकणार हे आत्ताच्या एकूण परिस्थितीवरून लक्षात येते आहे.

पवारांनी केलेल्या ‘या’ मोठ्या घोषणेमुळे कॉंग्रेस-भाजप नेत्यांचा जीव भांड्यात पडला