शिवसेना नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नावावर जिंकते, आता युती टिकवायची असल्यास माफी मागा

टीम महाराष्ट्र देशा: मीरा भाईंदर महापालिकेत भाजप – शिवसेना नगरसेवकांत झालेला राडा सध्या चांगलाच गाजत आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांमुळे बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा प्रस्ताव बारगळत असल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेत महापौर दालनाची तोडफोड केली. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये नव्याने वाद उफाळून आला आहे.

मारहाणीचा निषेध करताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आजवर शिवसैनिकांनी उत्तर भारतीय, गुजराती, मुस्लिम यांना मारहाण केली. परंतु आता महिला महापौराला मारहाण करणे योग्य नाही. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांवर मारहाणीचे संस्कार आहेत का ? एका बाजूला स्त्री सन्मानाची भाषा केली जाते, तर दुसरीकडे महिलेला शिवीगाळ करता. हेच संस्कार आहेत का ? असा सवाल केला आहे.

शिवसेना नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नावावर जिंकते, यापुढे मीरा भाईंदरमध्ये युती ठेवायची असेल तर माफी मागावी, अशी भूमिका मेहता यांनी घेतली आहे. दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कलादालनासाठी एक रुपयाचा निधी आणला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर राजकारण केले जात आहे. जनताच यांना उत्तर देईल, अशी टीका नरेंद्र मेहता यांनी केली.