महेश लांडगेंचा दिलदारपणा; पूरग्रस्तांसाठी गुजरातवरून जर्सी गायी आणणार

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूरच्या लाल मातीशी असलेल्या पैलवानकीच्या ऋणातून पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पूरग्रस्त कोल्हापूर व सांगलीला शहरातून सर्वाधिक मदत दिली आहे. महापूरातील उध्वस्त कुटुंबे सावरावीत यासाठी आता ते त्यांना पशुधन व त्यातही जर्सी गाई देणार आहेत. त्या गुजरातमधून विकत घेऊन कोल्हापूर,सांगली येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहेत.

सतत पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली होती या पुरामुळे मोठ्या प्रमाणात पशुधनाची हानी झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना गाई, म्हशी देण्याचे आवाहन महेश लांडगेंनी केले होते. त्यानंतर दोन दिवसांतच ४० जणांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. या पशुधन मदतीच्या संकलनासाठी तीन जणांची वेगळी टीम तयार करण्यात आली आहे. आवाहनाला प्रतिसाद दिलेल्यांशी संपर्क साधून पशुधनाचे ट्रक सांगली, कोल्हापूरला आठवडाभरात पाठवणार आहे.

दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंसह जनावरांसाठी कडबाकुट्टी आदी साहित्याचे २८ ट्रक घेऊन सातारा व कोल्हापूरला गेलेले लांडगे त्याचे वाटप करून काल पुन्हा भोसरीत येताच त्यांनी पशुधनाच्या मदतीसाठी बैठक घेतली. यावेळी पशुधन म्हणून जर्सी गाय देण्याचे ठरले. दररोज १० ते १२ लीटर दूध देणाऱ्या या गाईंमुळे ही कुटुंबे सावरून त्यांची आर्थिक घडी लगेच बसण्यात मदत होईल, असे ठरविण्यात आले. तसेच या गायी खऱ्या गरजवंताना दिल्या जाणार आहे.

त्याची खात्री कोल्हापूर व सांगली येथील पशुधन अधिकाऱ्यांचे मृत गाई, म्हशी, बैलांचे पंचनामे व सबंधित कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहून केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. पशुधन देण्याची तयारी दाखविलेल्यांकडून त्यापोटी पैसे घेऊन ते देऊन गुजरातहून या दुभत्या गाई आणल्या जाणार आहेत. दानशूरांकडून प्रत्यक्ष गाई व म्हशींची मदतही ती रवाना करण्याच्या आदल्या दिवशी स्वीकारली जाणार आहे. त्यामुळे त्यांना सांभाळण्याचा प्रश्न उभा राहणार नसल्याचे सांगण्यात आले.