औद्योगिक परिसरातील विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करा – आमदार महेश लांडगे

पुणे – पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडीत वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. वीज गेल्यानंतर पाच तास परत चालू होत नाही. त्यामुळे सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. महावितरणच्या अधिका-यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा. काळजीपूर्वक कामे करावीत. निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी महावितरणच्या अधिका-यांना दिल्या आहेत.

औद्योगिक परिसरातील विद्युत पुरवठ्याच्या समस्येबाबत आमदार महेश लांडगे यांनी महावितरणचे अधिकारी, लघु उद्योग संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी खंडीत विजेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता तालेवार, अधिक्षक अभियंता तगलपलवार, प्रभारी कार्यकारी अभियंता बारणे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांनी दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे

– औद्योगिक परिसरातील ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ जुने झाले असून जुन्या ‘ओव्हरवेड’ वायर तुटून, कमी क्षमतेच्या ‘ट्रान्सफार्मर’वर जादा भार दिल्यामुळे विजपुरवठा खंडीत होत आहे. ट्रान्सफार्मर ओव्हरलोड झाले आहेत. त्यामुळे जादा क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत. ओव्हरहेड वायर लोंबकळत असल्यामुळे उंचीच्या मालवाहतूक करणा-या वाहनांना त्या खालून जाता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून सर्व ठिकाणी ओव्हरहेड वायर काढून भुमीगत केबल टाकून वीजपुरवठा करावा.

– कुदळवाडी चिखली परिसर मोई चाकण फीडरला जोडल्यामुळे या परिसरातील हजारो उद्योगांना चार ते आठ तास सक्तीचे भारनीयमन सहन करावे लागते. त्यामुळे कुदळवाडी, चिखली परिसर टेल्को फीडरला तातडीने जोडण्यात यावा.

– उद्योजकांना वीज मीटर उपलब्ध करुन देण्यात यावेत.

– तळवडे औद्योगिक परिसरातील वारंवार होणा-या खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी येथील देवी इंद्रायणी सब स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरु करावे.

– नवीन वीज पुरवठा मागणी मंजूरी पद्धत ट्रान्सफॉर्मरचे एम.डीय फॅक्टर यापूर्वीच्या पद्धतीने सुरु ठेवण्यात यावा.

– महावितरणने वीज नियामक आयोगाकडे मागितलेली वीज दरवाढ रद्द करावी.

– डी.पी. फिडर बॉक्सची झाकणे चोरीला गेल्यामुळे फिडर उघडले पडले आहेत. त्यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो. सर्व डी.पी. फिडर बॉक्सला झाकणे बसविण्यात यावीत. जुने झालेले सर्व डी.पी. बॉक्स व फिडर नवीन लावण्यात यावेत. महावितरणच्या कर्मचा-यांना वेळेवर केबलचे साहित्य देण्यात यावे, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.

– उद्योजकाचे वीज बिलाचे धनादेश काही कारणास्तव परत गेल्यास महावितरण पैसे भरण्याची सुविधा सहा महिने ते एक वर्षाकरिता बंद करते. तो कालावधी अधिक असून एक महिन्यावर आणावा.

– महावितरणमधील अनुभवी कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचा-यांची भरती केली जाते. प्रत्येक विभागात पुरेशे कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने विजपुरवठा खंडीत झाल्यास उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसतो. सर्व विभागात महावितरणतर्फे पुरेसा व अनुभवी कर्मचारी वर्गाची भरती करावी.

– औद्योगिक परिसर व त्यालगत असलेल्या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात विजचोरी व विजगळती होत असून गळतीचे प्रमाण करावे. वीज चोरीवर कडक कारवाई करावी.

– केबल नादुरुस्त झाल्यावर केबल नादुरुस्त ठिकाणी शोधणारी गाडी तक्रार केल्यावरही दोन-दोन दिवस येत नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र गाडी देण्यात यावी.

– औद्योगिक पट्यातील प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पुर्ण करा. ज्या परिसरात काम केले जाणार आहेत. तेथील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे.

 

स्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून