शांतीमोर्चा काढण्याची भाषा करून जलील यांनी भंपकपणा करू नये – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गेल्या आठवड्यात दोन गटात झालेल्या वादातून हिंसाचार भडकला होता. या दंगलीत २ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला, दरम्यान आता या घटनेला राजकीय वळण मिळताना दिसत आहे.

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद दंगल प्रकरणी खासदार चंद्रकांत खैरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘दंगल घडवणाऱ्या काही मूठभर लोकांमुळे शहराला बदनाम करणं योग्य नाही. शहराला शांतता हवी आहे, त्यामुळे यापुढे एकत्र येऊन प्रयत्न करु,’ असं आवाहन जलिल यांनी खैरेंना या पत्राद्वारे केलं आहे.

दरम्यान चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांनी पाठवलेल्या पत्राचा चांगलाच समाचार घेत त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दोन दिवस शहर जळत होत, दंगेखोर घरावर दगडफेक करत होते, दुकाना जाळत होते तेव्हा शांतीमोर्चाचा सल्ला देणार इम्तियाज जलील कुठे होते?’ असा सवाल खैरे यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की ‘आम्ही नागरिकांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो, शिवसैनिकांना शांत केले. पण पेट्रोल बॉम्ब, रॉकेलचे बोळे घेऊन दंगेखोर मंदिर व महिलांवर हल्ले करत असतांना त्यांना रोखण्यासाठी इम्तियाज जलील का रस्त्यावर आले नाही? ते तर तिकडे कॅनडात जाऊन बसले होते. तेव्हा उगाच शांतीमोर्चा काढण्याची भाषा करून त्यांनी भंपकपणा करू नये’ असा टोला शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांना लगावला आहे एका वेबसाईटशी बोलताना खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्या पत्राला उत्तर दिले.