आमदारनिधी तीन कोटींवरून पुन्हा दोन कोटी करतो, अजित पवारांचा विरोधकांना टोला

मुंबई : या अर्थसंकल्पातून राज्यात समतोल साधला गेला नाही आणि विकासनिधीही कमी देण्यात आला, अशी टीका विरोधकांनी सरकारवर केली आहे. यावर विधानसभेत बोलताना पवारांनी प्रादेशिक समतोलाचा आरोप फेटाळून लावला. तसेच विरोधी बाकांवरील आमदारांकडे मिश्किलपणे नजर फिरवत, ‘तीन कोटींचे परत दोन कोटी करतो, मग समतोल साधला जाईल’, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने नुकताच आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने आमदारांच्या विकासनिधीत वाढ करून त्यांना खूश केले. यावेळी अर्थसंकल्प कसा सर्वसमावेशक आहे हे देखील अजित पवारांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोधी पक्ष भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला. ते म्हणाले, देशात मंदीचे वातावरण असतानाही अनेक वृत्तपत्रांनी बजेटचे स्वागत केले आहे.

विरोधक उगाचच टीका करत आहेत. मात्र, लोकशाहीत टीकेचे स्वागत आहे. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी २०११ नंतर आमदारांच्या निधीत एक कोटी रुपयांची वाढ करत असल्याची घोषणा केली होती. तेव्हा सर्वच आमदारांनी पवारांच्या या निर्णयाचे स्वागत केले होते.