मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतल्यापासून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. अनेक राजकीय नेते व धार्मिक, सामाजिक संघटनांकडून राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध केला जात आहे. त्यांच्या भूमिकेवरती टीका केली जात आहे. महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे यांच्याकडून अशी वक्तव्ये होत असल्याच्या चर्चा आहेत. पुण्यात त्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी एका मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं पठण केलं. त्यानंतर त्यांनी पुण्यात अनेक ठिकाणी भेटी सुद्धा दिल्या असल्याची माहिती मिळत आहे. दौऱ्यात असताना त्यांनी दोन गोष्टी जाहीर केल्या. एक मे ला महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे सभा घेणार आणि ५ जून ला अयोध्येचा दौरा करणार. पुण्यातील पत्रकार परिषदेतील राज ठाकरे यांचं विधान वादग्रस्त आणि चितावणीखोर असल्याचं असिफ शेख यांचं म्हणणं आहे. असिफ शेख यांनी गृहमंत्र्यांना पत्रं लिहून, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या पत्रावर गृहमंत्रालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आक्रमक झालेली आहे. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाही तर त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असा आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला.
दरम्यान संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. दोन प्रमुख शहरात दंगलीचे वातावरण निर्माण केले जात आहे. भाजपकडून हे सगळे प्रकार केले जात आहेत. या आधी राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी कधीही दंगली झाल्या नाहीत. मुंबई मध्ये तुमची ताकत नाही, त्यामुळे कोणाला तरी काम दिले आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे. तुमच्या हातून महापालिका जाणार म्हणून तुम्ही दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहात. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. कोरोनानंतर आता कुठे अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे. मात्र काही लोक उगाच अशांतता पसरवण्याचे काम करत आहे, अशी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या बातम्या :