निलंग्याच्या विकासासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी केला ‘हा’ निश्चय 

abhimanyu pawar

निलंगा: औसा विधानसभा मतदारसंघात निलंगा तालुक्यातील 68 गावांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

औसा विधानसभा मतदारसंघात निलंगा तालुक्यातील 68 गावांचा समावेश आहे. या गावांतील विकासकामे आणि विविध अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधताना ते म्हणाले, की मतदारसंघातील बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीची मोठी समस्या निर्माण झाली असून याबाबत मतदारसंघातील दफनभूमीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

ज्या ग्रामपंचायती ग्रुप आहेत, त्यांचे लोकसंख्येच्या आधारावर विभाजन केले जाणार आहे. मतदारसंघातील गावांमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून मटका, दारू, जुगार अशा धंद्यावर पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. मंजूर झालेल्या विकासकामांची गुणवत्ता दर्जेदार ठेवण्यासाठी संबंधित विभागांना आदेश देण्यात आले आहेत.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बैठकीला उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, घनश्याम आडसूळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.