भारत बंद आंदोलनाला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद

भारत बंद आंदोलनाला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद

bharat band

मुंबई : केंद्र सरकारने तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

सध्या दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परंतु, केंद्र सरकारने या आंदोलनाची अद्यापही दखल घेतलेली नाही. या आंदोलनाला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जळगावात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला. सकाळी बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने भारत बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवत नव्हता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.

केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत, कामगार कायद्यामध्ये केलेला बदल थांबवावा, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या संघटना यांनी आक्रमक होऊन माजलगाव आणि केज येथे राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी तब्बल एक तास वाहतूक खोळंबली होती.

तर मुंबईतील विक्रोळी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हमीद अन्सारी यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आला होता यावेळी आंदोलकांना बाजूला करण्याकरिता पोलीसांना बलाचा वापर करावा लागला. भिवंडी, शहापूरमध्ये देखील या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, बहुजन विकास आघाडी तसेच प्रहार संघटना यांनी आंदोलनात आपला सहभाग नोंदवला आहे.

मुंबई – नाशिक महामार्गावर काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले तर शहापूरमध्ये बाजार पेठेतून रॅली काढून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याच्या आवारातील सर्व संघटनांच्या वतीनं आज मार्केटयार्ड बंद ठेवण्यात आले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या