पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर लिहिण्याची वेळ

औरंगाबाद: पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर लिहिण्याची वेळ ऐनवेळी केंद्र दिलेल्या गजानन विद्यालयात आल्याने विद्यापीठाने या केंद्रास नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ढिसाळ नियोजनामुळे ऐनवेळी केंद्र बदलल्याने हा गोंधळ उडाल्याचे पुढे आले आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपले केंद्र सापडत नव्हते आणि सापडले तर तेथे क्रमांक मिळत नव्हते. ऐनवेळी 21 परीक्षाकेंद्रांची जागा बदलल्याने हा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.

शहरातील व विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्वच जिल्ह्यात परीक्षा विभागाचे अपुरे नियोजन पदवी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला पुढे आले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा नियोजनाच्या गोंधळाचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे. सकाळीच अभ्यास करून परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रावर आपला क्रमांक सापडत नव्हता. परीक्षेची वेळ जवळ येत असताना क्रमांक सापडत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. या परीक्षेला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तब्बल 3 लाख 5 हजार 494 विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेचा शुभारंभ ढिसाळ नियोजनाने झाला. विद्यापीठाच्या पदवी परीक्षा तब्बल 224 केंद्रांवर सुरु आहेत. यात औरंगाबद शहरात 32, औरंगाबाद ग्रामीणमध्ये 48, जालना शहर 12, जालना ग्रामीण 34, बीड शहर 10, बीड ग्रामीण 51, उस्मानाबाद शहर 9 आणि उस्मानाबाद ग्रामीणमध्ये 28 परीक्षा केंद्र असणार आहेत.