fbpx

रोज चित्रपट पाहण्यासाठी अल्पवयीन मुलगा करत असे चो-या

cinema

पुणे : रोज नविन चित्रपट पाहण्यासाठी लागणा-या पैशासाठी चो-या करणा-या अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. चोरीचे मोबाईल आणि लॅपटॉप विकण्यासाठी हा मुलगा कात्रज परिसरातील त्रिमुर्ती चौकात थांबला असताना ही कारवाई केली. यावेळी त्याच्या ताब्यातून दोन लॅपटॉप आणि 10 मोबाईल जप्त केले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड हे स्टाफसह पेट्रोलींग करत असताना पोलीस कर्मचारी समीर बागसिराज यांना आरोपीविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्रिमुर्ती चौक येथे धाव घेतली असता एक अल्पवयीन मुलगा आढळला. त्याला ताब्यात घेवून त्याच्याजवळील बॅगची झडती घेतली असता वरील मुद्देमाल आढळला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने ते मोबाईल सहकारनगर, डेक्कन, भारती विद्यापीठ पोलिसांच्या हद्दीतून चोरल्याचे सांगितले. चौकशी दरम्यान त्याने, चित्रपट पाहण्याच्या हौसेपोटी चोरी करत असल्याचे सांगितले. आतापर्यंत त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत.