खासदार नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद ?

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या बातम्या येत असताना आता भाजपने राणेंची मनधरणी करायला सुरुवात केली आहे.त्या पार्श्वभूमीवरच खासदार नारायण राणे यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली असून त्यात मुख्यमंत्र्यांना राणेंचे मन वळवण्यात यश आल्याचे बोलले जात आहे.यामध्ये आगामी निवडणुकीनंतर राणेंना केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

यावेळी येत्या लोकसभा निवडनुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी ३ जागा सोडण्याची मागणी राणे यांनी केली आहे. यामध्ये रत्नागिरी-सिंधूदुर्ग,औरंगाबाद आणि माढा या जागेवर राणेंनी दावा टाकला आहे. माजी खासदार नीलेश राणे यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदूर्ग आणि औरंगाबाद हा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. जर शिवसेना-भाजपची युती झाली तर हाडवैर असलेल्या राणेंसाठी शिवसेना या दोन जागा सोडेल का हे बघावे लागणार आहे.तसेच या निवडनुकीत राणे त्यांच्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरतील अशीही माहिती मिळत आहे.