काकांना पुतण्याची भीती कधीपासून; रामदास कदमांचा राज ठाकरेंवर निशाना

मुंबई: राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिक बंदीवरून मनसे आणि शिवसेनेमध्ये नवीन कलगीतुरा निर्माण झाला आहे. प्लास्टिक बंदी मान्य आहे पण दंड आकारणी जास्त असल्याचा  आक्षेप मनसेकडून घेण्यात आला आहे. मनसेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेचा समाचार घेताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.

आदित्य ठाकरेंनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानेच मनसेकडून विरोध होतो आहे, पण काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली असा प्रश्न राज ठाकरेंना विचारायचा असल्याची टीका कदम यांनी केली आहे. प्लॅस्टिक बंदीबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्लॅस्टिक बंदीविषयी प्रबोधन करणाऱ्या माध्यमांचे कदम यांना आभार मानले.

यावेळी कदम म्हणाले कि, प्लास्टिक बंदीचा निर्णय नोटाबंदीप्रमाणे नसून सहा महिन्यांआधी घोषणा करण्यात आली होती, यावर न्यायालयाने तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली. मात्र तरीही राजकीय पुढाऱ्यांना याची कल्पना नसल्यास तो त्यांचा दोष असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला.