fbpx

कोकण विभागातील कुणबी समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचे राज्यमंत्री चव्हाण यांचे निर्देश

मुंबई : कोकणातील कुणबी जातीतील लोकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी याबाबतची माहिती एकत्रित करुन तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. मुख्यमंत्र्यांकडे याबाबतीत झालेल्या बैठकीतील कामाचा त्यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात आज आढावा घेतला.

या बैठकीला रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण महसूल उपायुक्त सिद्धाराम सालीमठ, पनवेल विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर, माजी आमदार डॉ. विनय नातू, कुणबी समाज संघटना अध्यक्ष भूषण बरे, विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे उपसचिव रवींद्र गुरव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, कोकणातील पाचही जिल्ह्यात कुणबी समाजाला जात प्रमाणपत्र मिळताना 1967 च्या वास्तव्याचा पुरावा मागितला जातो. ही अट दूर करण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. या संदर्भात राज्यातील इतर भागातील कुणबी समाजाचा समावेश ज्या प्रमाणे इतर मागास वर्ग म्हणून झाला आहे त्याच प्रमाणे कोकणातील कुणबी समाजाची नोंद व्हावी या साठी नवीन मार्गदर्शक तत्वे तयार करून दाखले वाटपासाठी विशेष शिबीर आयोजित करुन हे दाखले देण्यात यावे असे आदेश त्यांनी दिले.

इतर मागासवर्गीय महामंडळांतर्गत कोकण विभागाकरिता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीची स्थापना झाली असून या महामंडळाचे भागभांडवल वाढविण्यासंदर्भातील निर्णय घ्यावा तसेच कोककणातील सिंधुदुर्ग, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यातील जमीन उपलब्धतेबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवून अशा जमिनी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.