‘या’ कारणामुळे आले मंत्री जितेंद्र आव्हाड नेटीझन्सच्या निशाण्यावर

टीम महाराष्ट्र देशा : प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राज्यातील विविध जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. शिवसेनेच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे गरिबांची भूक भागणार असून बचत गटांना रोजगारही मिळणार आहे.

एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवार यांनी शिवथाळी नाकारली. पण, असं करण्यामागचं योग्य कारणही त्यांनी दिलं. ‘गोरगरिबांसाठी थाळी देत आहोत. या थाळीचा गरीब होतकरू यांनी लाभ घ्यावा, ज्यांची ऐपत आहे. त्यांनी लाभ घेऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

तर दुसरीकडे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले. त्यानंतर, 10 रुपयातील थाळीचा आस्वादही त्यांनी घेतला. मात्र, आव्हाड यांच्यासोबत 10 रुपयांच्या थाळीसोबत 10 ते 15 रुपयांची पाण्याची बाटली असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. 10 रुपयांच्या थाळीसोबत पाण्याची बाटलीही मिळणार का? असा प्रश्न विचारत नेटीझन्सनी आव्हाडांना ट्रोल केलं आहे.

दहा रुपयांच्या थाळीसोबत 10 ते 15 रुपयांची पाणीबॉटल असल्याने गरिबांनाही थाळीसोबतच पाणी बॉटल मिळणार का, असे म्हणत आव्हाड यांचा फोटो व्हायरल करण्यात येत आहे. आव्हाड यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरही नेटीझन्सने टीकात्मक प्रश्न विचारले आहेत.