गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील अडचणीत

blank

अकोला : बांधकाम विभागाच्या एका निविदा प्रकरणात जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर निविदा मंजुर करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दबाव आणल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात पालकमंत्र्यांनी जनता दरबारात जाहीर अपमान करून एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करुन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी ग्रामविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन स्वेच्छा निवृत्ती मंजूर करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात एका प्रकरणात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एका निविदा प्रकरणात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यावर निविदा मंजुर करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप होत आहे. अशा प्रकारे निविदा मंजुर करणे नियमबाह्य होईल असे पालकमंत्र्यांना निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी चिडून सोमवार (ता.१२ ) जनता दरबारात असंसदीय व अपमानास्पद भाषेत बोलून जाहीर अपमान केल्याची तक्रार डॉ. पवार यांनी ग्रामविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.

मी राज्याचा गृह राज्यमंत्री आहे, तुम्हाला कोणत्या प्रकरणात कसे अडकवायचे ते पाहतो, तुम्ही शासनाची नोकरी कशाला करत, अशी धमकी डॉ. रणजित पाटील यांनी दिल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी म्हटले आहे. आजपर्यंतच्या 25 वर्षाच्या सेवाकाळात अशा पद्धतीने अपमानास्पद वागणुकीस कधी आपल्याला सामोरे जावे लागले नसून आजपर्यंतचा सेवाकाळ हा निष्कलंक असून आपल्यावर कधी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कार्यवाही झालेली नाही. मात्र, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अशा पद्धतीने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे माझ्यावर प्रचंड मानसिक दडपण आले असुन माझे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे यापुढे शासकीय सेवा करण्यास मी इच्छुक नसुन आपला स्वेच्छा निवृत्ती मंजुर करावी, अशी विनंती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी प्रधान सचिवांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.