कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत कार्यकर्त्यांनी मंत्री दत्तात्रय भरणेंना खांद्यावर घेतले!

कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत कार्यकर्त्यांनी मंत्री दत्तात्रय भरणेंना खांद्यावर घेतले!

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सण उत्सवात, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी सभा अशा सर्वच कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातलेली आहे. अशातच राजकीय नेते शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांची सर्रास पायमल्ली करताना दिसत आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यात विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी भरणे यांना खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढली. विशेष म्हणजे यावेळी एकाही कार्यकर्त्यांने मास्क घातलेला नव्हता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार कोरोनाच्या नियमांचे पालन करा असे सांगतात. अजित पवारांनी तर थेट एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला मास्क हनुवटीवर असल्याने पोलिसांना उचलून न्यायचे सांगू का अशी धमकी दिली होती. शिवाय कोरोनाचे कारण सांगत मंदिरे उघडण्यास बंदी आहे. आता गणेशोत्सवालाही निर्बंध घालण्यात आलेत. कोरोनाची भीती राज्य सरकारला कितपत आहे हे यावरून दिसून येते.

मात्र, दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री सरकारच्या आवाहन आणि नियमाला केराची टोपली दाखवत असल्याचे दिसत आहे. इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीच कोरोना नियम पायदळी तुडविले आहेत. विविध विकासमांचे भूमिपूजन व जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी भरणे पिंपरी बुद्रुक येथे आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क भरणेंना खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढली. महत्त्वाचे म्हणजे राज्यमंत्र्यांसह कार्यकर्त्यांनीकडे मास्क नव्हता. कार्यकर्त्यांनी तर प्रचंड गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. कोरोनाचे नियम फक्त सर्व समान्यांसाठीच आहेत का? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लासुर्णे येथील कार्यक्रमालाही राज्यमंत्री भरणे उपस्थित होते. तेथेही अशीच विनामास्कची गर्दी झाली होती. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना पायदळी तुडवण्याचे काम राष्ट्रवादीतीलच काही नेतेमंडळींकडून होत आहे. नियम केवळ सर्वसामान्य लोकांसाठीच आहेत का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. सदरील कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या