नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरच मंत्र्यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक!

gadhakh

उस्मानाबाद/ऋषिकेश घोगरे:- मागील चार दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे.

पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी काल उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. ना.गडाख यांनी यावेळी जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांची बैठक चक्क शेतकऱ्यांच्या बांधावर बोलावली. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासन नेमके काय काम करत आहे, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

उस्मानाबाद जिल्हातील ७३६ गावांपैकी ७० गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उरलेल्या गावांना देखील पावसाचा फटका बसला आहे. काल ना.गडाख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन धीर दिला. शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण सरकार आपल्या सोबत आहे तसेच एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही ना.गडाख यांनी शेतकऱ्यांना दिली.

दरम्यान, निसर्गाने उध्वस्त केलेल्या शेतकऱ्यांना आता शाब्दिक आधारा सोबत आर्थिक आधार देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर बैठक घेतली हे ठीक आहे, मात्र आर्थिक मदतही लवकर द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-