मंत्री आदित्य ठाकरेंची सुचना; शिर्डीत पर्यटन माहिती केंद्र सुरू होणार

अहमदनगर : शिर्डी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या देवस्थानाला भेट देणाऱ्या धार्मिक व इतर हौशी पर्यटकांना अहमदनगर जिल्ह्यातील इतरही पर्यटनस्थळांची माहिती होणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा केल्याने, शिर्डीत पर्यटक माहिती केंद्र सुरू करण्याच्या सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत.

शिर्डीत दरवर्षी देशातून व परदेशातूनही लाखो भाविक येत असतात. त्यातील अनेक जण शिर्डी तर काही जण शनिशिंगणापूरला भेट देतात. अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा असून ऐतिहासिक आहे. या जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले व निसर्ग समृद्धीने नटलेले भंडारदरा धरण, निळवंडे धरण, रंधा धबधबा, अम्ब्रेला फॉल, कळसूबाई शिखर, रतनवाडी, सानंददरी, अहमदनगर शहरातील भुईकोट किल्ला, चांदबिबीचा महल, नेवासे येथील संत ज्ञानेश्वरांचे मंदिर, देवगड, सिद्धीटेक, यासह हिवरेबाजार, राळेगणसिद्धी असे पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत.

या सर्व पर्यटन व निसर्ग स्थळांची माहिती बाहेरून आलेल्या भाविकांना व पर्यटकांना मिळाली तर त्यांनाही हे वैभव पाहता येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाला ही मोठी चालना मिळणार आहे. त्यातून रोजगार निर्मिती वाढून त्या ठिकाणच्या ग्रामीण आर्थिक व्यवस्थेला मजबुती मिळणार आहे.

शिर्डी येथे पर्यटनाची माहिती देणारे अद्ययावत पर्यटन माहिती केंद्र सुरू व्हावे, यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. या मागणीला आदित्य ठाकरे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला, शिर्डी येथे पर्यटन माहिती केंद्र सुरू करून तेथे दोन व्यक्तींची कायमस्वरूपी नेमणूक करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिर्डी येथे पोलिस अधीक्षक मनोज पाटील व पोलिस प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीत हे माहिती केंद्र सुरू होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या