राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी, सुरक्षित अन्न मिळण्यासाठी शासन कटिबद्ध – गिरीश बापट

Min Girish Bapat at World Food Safety Day Prog 3

मुंबई, दि. ७ : राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी शासन कटिबद्ध असून यासाठी सर्व अन्न खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सोबत घेऊन मोहीम राबविणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. जागतिक अन्न सुरक्षितता दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन सचिव संजय देशमुख, अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आणि ‘एफ एस एस आय’ चे मुख्य कार्यकारी संचालक पवन अग्रवाल, सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर, ‘गेन’या संस्थेचे भारतातील प्रमुख तरूण वीज आणि ए एफ एस टी आय’ चे अध्यक्ष डॉ. प्रबोध हलदे व इतर वरिष्ठ अधिकारी, विविध अन्न खाद्यपदार्थ व्यावसायिक व समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. बापट म्हणाले, अन्न सुरक्षिततेच्या बाबतीत राज्याने अनेक नव्या योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अन्न सुरक्षेच्या बाबतीतील बऱ्याच पुढाकारांचे देशभरात अनुकरणही होत आहे. पूर्वी अन्न खाद्य पदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची दहशत वाटत असे. आता सर्वांना सोबत घेऊन सामंजस्याने प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करून देऊन अन्न सुरक्षेसंदर्भातील काम होत आहे. यात सर्वांचा सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. यासाठी गावागावात जाऊन प्रबोधन करण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.