मुख्यमंत्र्यांच्या उपहासात्मक स्वागतासाठी एमआयएमचे ‘मावळे’ सज्ज!

Imtiaz Jaleel

औरंगाबाद : जिल्ह्यात होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत केल्याच्या विरोधात एमआयएमच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. या आंदोलनामुळे खासदार इम्तियाज जलील आणि एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. लोकशाही असलेल्या राज्यात विरोध दर्शवायचा नसेल तर आम्ही त्यासाठी स्वागत करतो, असे म्हणत एमआयएम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपहासात्मक स्वागत करणार आहे. त्यासाठी एमआयएमचे मावळे तुतारी वाजवणार असल्याचे खासदारांनी सांगितले आहे. त्या संदर्भातली बैठक खासदारांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

या उपहासात्मक आंदोलनाविषयी खासदार म्हणाले की, ‘मराठवाड्यास अतिजास्त भरीव निधी देवुन विविध लोकोपयोगी प्रकल्प, प्रस्ताव व नागरीकांच्या मुलभुत समस्याचे निवारण करुन मराठवाड्याचा सर्वांगिण विकास केल्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिध्दार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात उपस्थित राहण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीत आगमन करणारे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे मराठवाड्यांवर प्रेम करणारे सर्व मावळे मराठवाड्याच्या संस्कृतीनुसार चिकलठाणा विमानतळापासून ते सिध्दार्थ गार्डन पर्यंत तुतारी वाजवुन पुष्पवृष्टीने जंगी स्वागत करुन आभार व्यक्त करणार आहेत. मुख्यमंत्री व १४ कर्तृत्वान महापौरांनी मराठवाडा व औरंगाबाद स्मार्ट सिटी करिता केलेल्या विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. औरंगाबाद चिकलठाणा विमानतळापासुन ते सिध्दार्थ गार्डनपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व प्रत्येक चौकात मराठवाड्याचे मावळे कोणत्याही प्रकारची घोषणा न देता कोरोना संदर्भातील नियमावलींचे पालन करुन लाडक्या मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर पुप्षवृष्टी करुन त्यांनी व त्यांच्या १४ कर्तृत्वान महापौरांनी केलेल्या विकास कामांचे माहिती फलक दाखविले जाणार आहे. शिवसेना पक्षाचे १४ कर्तृत्वान महापौरांनी औरंगाबादेत केलेल्या विकास कामांच्या श्रेयात बीजेपी ही तेवढीच सहभागी आहे. कारण १४ कर्तृत्वान महापौर बीजेपीच्या पाठींब्यानेच औरंगाबाद महानगरपालिकेत विराजमान झाले होते.’

मुख्यमंत्री व १४ कर्तृत्ववान महापौरांनी औरंगाबादेत विकासाची गंगा वाहिली व संपुर्ण जगात औरंगाबादचे नाव लौकिक केल्याने त्यांच्या स्वागत समारंभात कोणत्याही प्रकारची हलगय व हलगर्जीपणा खपवुन घेतला जाणार नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. एमआयएमच्या या अनोख्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्याचा औरंगाबाद दौरा चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या