एमआय एम, मनसे आम्हाला चालणार नाही :अशोक चव्हाण

पुणे : लोकसभेसाठी आमची राष्ट्रवादी व अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे, मात्र आम्हाला एम आय एम किंवा मनसे यापैकी कोणीही नको. आमच्या मित्र पक्षाकडूनही नको असे स्पष्ट विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.

पुण्यात काँग्रेसच्या जनसंघर्ष सभेपुर्वीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की,प्रकाश आंबेडकर आले तर आनंदच आहे, मात्र त्यासाठी त्यांना एम.आय.एम’ची साथ सोडावी लागेल असे ते म्हणाले.

पुण्याची जागा लढवण्यावर ते म्हणाले की, पुण्याची जागा आमचीच आहे, ती आम्ही लढवू, निवडून येण्याची क्षमता हीच गुणवत्ता आहे. निवडणूक आयोगाने दिलेला खर्च करण्याची क्षमता हाही निकष आहे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितला असला तरी आम्हीही आग्रही आहोत.

अशोक चव्हाण म्हणाले की, मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तसेच दोन वर्ष झाले तरी कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा संप करण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे.सरकारचची दुष्काळाची घोषणा ही केवळ कागदावरच असून टॅंकर, विद्यार्थ्यांची फी माफी, चारा यापैकी कोणत्याही उपाययोजना नाहीत.

दरम्यान राहूल गांधी मराठवाड्यातील नांदेडमधुन लढणार अशी चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना चव्हाण म्हणाले की,कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघातुन निवडून येऊ शकतात. पण ते नांदेडमधुन निवडणूक लढवणार याबाबत मला तरी काही माहिती नाही.