नांदेडमधील सपशेल पराभव एमआयएमच्या राजकारणाची दिशा दाखविणारा

asaduddin-owaisi

औरंगाबाद: ज्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत अचानक 13 जागा जिंकून 2012 साली एमआयएमने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला त्याच नांदेडमध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमचा सपशेल पराभव झाला आहे. नांदेड वाघाळा महापालिकेच्या निकालावरून कोणी राज्याच्या राजकारणाचे भाकित किंवा विश्‍लेषण करू लागले तर मोठी फसगत होईल. मात्र, एमआयएमच्या राजकीय अस्तित्त्वाची प्रक्रिया जशी नांदेडमध्ये घडली तशी ती राज्यातही घडू शकेल असे कोणी म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

Loading...

नांदेडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व अनेक वर्षांपासून आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी येथे केलेला व्यापक जनसंपर्क आणि विकासाची केलेली कामे याचा मोठा प्रभाव येथील जनमानसात खोलवर आहे. त्याची प्रचिती अनेक निवडणुकांमध्ये आलेली आहे. अगदी मोदी लाटेमध्येही नांदेड आणि हिंगोली मतदारसंघात काँग्रेसने लोकसभेच्या जागा मिळवून पक्षाची लाज राखली होती. नांदेड महानगरपालिका निवडणुकीमध्ये गेल्यावेळी एमआयएमने जबरदस्त यश मिळवूनही महापालिकेत काँग्रेसने बहुमत मिळवलेच होते. नांदेड शहरात भाजपचे अस्तित्त्व इतिहासात नेहमी नगण्यच राहिले आहे. त्यामु ळे या निवडणुकी त भाजपला काँग्रेसच्या तुलनेत कमी जागा मिळाल्या त्यावरून कोणी राज्य, देश पातळीवर भाजपचे जनसमर्थन कमी झाल्याचा अर्थ काढला तर त्यातून मोठी फसगतच होईल. फक्‍त भाजपने जे बेरजेचे राजकारण करत नांदेडमध्ये चमत्कार घडवत लातूरसारखे चमत्कारी यश मिळवण्याचे नियोजन केले होते, त्याबाबत सपशेल अपेक्षाभंग झाला.

शिवसेनेने नांदेड शहरात काही शक्‍ती निर्माण केली होती त्यामानाने शिवसेनला मोठा फटका बसला आहे. सत्तेत राहून भाजपला विरोध करण्याची सेनेची भूमिका लोकांना मान्य नाही हे पुन्हा एकदा पुढे आले आहे. सेना यातून काही बोध घेण्याची शक्यता कमीच आहे. एमआयएमला 2012 साली नांदेड महापालिकेत मोठे यश मिळाले याचे कारण अनेक वर्षे काँग्रेसची पाठराखण करून मुस्लिमांच्या स्थितीत काहीच फरक पडत नाही, असे अनुभवाला आल्याने पर्यायाच्या शोधात असलेल्या मुस्लिम समाजाला एमआयएमच्या रूपाने पर्याय मिळाला असे वाटून मुस्लिम समाजाने एमआयएमला त्यावेळी मते दिली. नंतर विधानसभेला औरंगाबादमध्ये आणि मुंबईत भायखळा येथे दोन आमदारही निवडून आले. मात्र गेल्या पाच वर्षात एमआयएमने मुस्लिम समाजाला गृहित धरून त्यांच्या विकासाकडे, प्रश्‍नांकडे दुर्लक्षच केले. फक्‍त भडक भाषा, दहशतवाद्यांचे समर्थन करत राहिले की मुस्लिम समाज आपल्यासोबत फरफटत येईल हा एमआयएमचा भ्रम होता, हे आता नांदेडच्या निकालावरून स्पष्टच झाले आहे. मात्र हे केवळ या एकाच कारणाने घडलेले नाही. अशोक चव्हाण यांनी एमआयएम पासून काँग्रेसला असलेला धोका लक्षात घेवून अशोक चव्हाण यांनी प्रत्येक वॉर्डात अगदी तपशीलवाल नियोजन केले. एमआयएमच्या अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवले. आपला पक्ष पोखरत चालला आहे हे एमआयएमला शेवटपर्यंत समजले नाही. त्यामुळे जनाधार आणि संघटन या दोन्ही पातळीवर एमआयएमला दणका बसला आहे.

अगदी एमआएमचे प्रदेशाध्यक्ष मोईन यांची आईसुद्धा नांदेड मनपा निवडणुकीत पराभूत झाली आहे. नांदेडच्या पराभवाची पुनरावृत्ती राज्यात अन्यत्रही घडू शकते. काँग्रेसचा परंपरागत मतदार काँग्रेसकडे परत वळवण्यात नांदेडप्रमाणे अन्यत्रही जर काँग्रेसने यश मिळवले तर राजकीय समिकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. या दृष्टीने नांदेडच्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी दिलेला हा कौल जास्त महत्त्वाचा आहे. एमआयएमसारख्या पक्षाच्या देशाच्या राजकारणातील वाटचालीची दिशाच या निवडणुकीने दर्शविली आहे.Loading…


Loading…

Loading...