विद्यापीठ नामांतरनाचा दुसरा भाग; एमआयएम नगरसेवकाचा थेट सोलापूरचे नाव बदलण्याचा प्रस्ताव

solapur city

सोलापूर: सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र यानंतर आता एका बाजूला लिंगायत समाजाची संघटना असलेल्या शिवा संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात रान उठवण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी थेट सोलापूरचेच नामांतर करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत मांडला आहे. सोलापूरचे नामकरण मोची समाजाचे कुलगुरू ‘जांबमुनी महाराज’ किंवा सोलापूरचे ‘सुफीसंत शाहजहूर’ असे करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत दाखल करण्यात आला.

सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेपासून लिंगायत समाजाच्या वतीने ग्रामदेवता सिद्धरामेश्वर यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. तर धनगर समाजाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा आग्रह धरण्यात येत होता. तीन दिवसांपूर्वी नागपूर येथे धनगर समाज मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठाला देण्याची घोषणा केली. यानंतर शिवा संघटनेकडून राज्यात अनेक ठिकाणी फडणवीस यांचा निषेध नोंदवत त्याचे पुतळे जाळले. तसेच सोमवारी सोलापूर बंदचे आवाहनही करण्यात आले आहे. यातच आता एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी आणि कॉंग्रेसच्या वैष्णवी करगुळे यांनी थेट शहराचेच नाव बदलण्याचा प्रस्ताव दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 Loading…
Loading...