विकास केला नसल्यानेच मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांना अटक- इम्तियाज जलील

mim

औरंगाबाद : मराठवाड्याचा विकास केल्याचा दावा ठाकरे सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. शहराचा विकास केल्याचा दावा करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘सुपर संभाजीनगर’ नावाने पुस्तक काढले. शहराचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते फुलांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करत आहे. मात्र, तरी देखील या कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे, की त्यांनी शहरासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळेच एमआयएमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

औरंगाबाद शहरातून क्रीडा विद्यापीठ स्थलांतरीत करुन पुण्याला नेण्यात आले. या विरोधात एमआयएमच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे या वेळी एमआयएमने अनोखे आंदोलन करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर पुष्पांचा वर्षाव केला. मात्र, तरी देखील एमआयएमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

औरंगाबाद महानगर पालिकेमध्ये इतक्या वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. तरी देखील शहरात विकासाच्या नावावर केवळ दिखावा करण्यात आलेला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे कामही शिवसेनेने केलेले नाही. या विरोधात एमआयएमच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त उपहासात्मक आंदोलन करुन एमआयएमने राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या