लाखो मंदिरे अवैध जागेवर बांधली आहेत, आव्हाडांचा अजब दावा

blank

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीमधील तुगलकाबाद येथील संत रविदास यांचे मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तोडल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे. पंजाब,दिल्ली तसेच हरियानामध्ये याविरोधात आंदोलने केली जात आहेत. आंदोलन करणाऱ्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा देखील जाळला आहे.

दिल्लीतील संत रविदास याचं मंदिर पाढण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आव्हाड यांनी न्यायालयाच्या निर्णयावर टीका करताना भारतात लाखो मंदिर आहेत जे सर्वच जवळजवळ अवैध जागेवर बांधली गेली आहेत असा अजब दावा केला आहे. आव्हाड म्हणतात, सुप्रीम कोर्टाच्या जज ने निर्णय दिलाय कि संत रविदास मंदिर तोडा कारण ते अवैध जागेवर बांधल आहे.बाबासाहेबांनी  ‘The untouchables’ हा ग्रंथ संत रविदासांना अर्पण केलाय.भारतात लाखो मंदिर आहेत जे सर्वच जवळजवळ अवैध जागेवर बांधली आहेत.पण अडचण याच मंदिराची आहे .कारण काय? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आव्हाड यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हिंदूंची लाखो मंदिरेचं फक्त अवैध जागेवर बांधली आहेत का असा सवाल सोशल मिडीयावर विचारला जाऊ लागला आहे. इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांबद्दल आव्हाड गप्प का असा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने पंजाब,दिल्ली तसेच हरियाना सरकारला झापले असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे कुणीही राजकारण करू नये असा सल्ला देखील दिला आहे. मात्र आता याच मुद्द्यावरून आव्हाड यांनी टीका केली आहे.