अवघा मराठा एकवटला.!

maratha-morcha

मुंबई : आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चासाठी पोलिसांसह महापालिका आणि अन्य यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल अशा विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज हे वादळ मुंबईत धडकणार असून मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजता भायखळातील जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात होईल. तिथून आझाद मैदानापर्यंत हा मूक मोर्चा मार्गक्रमण करेल.

विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना हा मोर्चा निघत असून सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. सर्वपक्षीय नेते या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता असून मोर्चाला राजकीय रंग येणार नाही यावर आयोजकांनी भर दिला आहे. मोर्चाच्या प्रथेनुसार महिला आणि तरुणींकडे मोर्चाचे नेतृत्व असेल. मोर्चाच्या निमित्ताने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शीव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे ते माहीम या भागांमधील ५०० शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका सज्ज

मराठा मोर्चासाठी महानगरपालिकेने आझाद मैदानाचे प्रवेशद्वार मोठे केले असून बॉम्बे जिमखानासमोरील जागेसह मैदान खुले केले आहे. मोर्चामधील सहभागकर्त्यांसाठी तात्पुरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. २० शौचकूपांची सोय असलेली १४ तात्पुरती शौचालये ठेवण्यात आली आहेत.

मुंबईत पहिल्यांदाच होणारा मराठा क्रांती मूक मोर्चा शांतता व शिस्तीत पार पडावा यासाठी वीस हजार स्वयंसेवक सज्ज आहेत. मोर्चाच्या नियोजनासाठी २३ समित्या व उपसमित्या तयार करण्यात आल्या होत्या. मोर्चासाठी बाहेरगावाहून येणाऱ्यांना त्यांची वाहने नवी मुंबईतील स्थानकांच्या आवारात तसेच वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभी करून पुढील प्रवास रेल्वेने करावा लागणार आहे. त्यामुळे हार्बर तसेच मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनवर तान येण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय सुविधा सज्ज

छत्रपती शिवाजी महाराज मेडिकोस असोसिएशन (मराठा मेडिकोस असोसिएशन)चे डॉक्टर्स मोर्चातील आंदोलकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. त्यासाठी सर्व डॉक्टर्सना चार ते पाच गटांत विभागले आहे.

तब्बल २० हजार पोलीस तैनात

मोर्चासाठी २० हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरणार आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह पाचही सहआयुक्तही तिथे असतील.