लाखभर नागरिकांना पुन्हा दुसऱ्या डोसची प्रतिक्षा; पहिला डोस घेऊन शंभर दिवस उलटले

vaccin

औरंगाबाद : मनपाच्या वतीने शहरात राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेंतर्गत आजवर साडे पाच लाखांवर नागरिकांचे लसीकरण झाले. असे असतानाही सुमारे लाख भर नागरीकांना अजूनही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे यातील बऱ्याच नागरिकांना पहिला डोस घेऊन शंभर दिवस उलटले असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. सुरूवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, जेष्ठ नागरिक, ४५ वर्षावरील नागरिक आणि १८ वर्षावरील नागरिक अशी टप्प्याटप्प्याने लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. महापालिकेने शहरात जम्बो लसीकरण मोहिम राबविण्यासाठी ११५ वॉर्डात प्रत्येकी या प्रमाणे काही लसीकरण केंद्र सुरू केले.

परंतु सतत लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत आहे. जुलैमध्ये केवळ मोजकेच दिवस लसीकरण झाले आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची यादी वाढतच चालली आहे. दुसऱ्या डोसला प्राधान्य देत जास्तीत जास्त केंद्रावर व्यवस्था केली जात आहे. तरी देखील ८४ दिवस पूर्ण झाल्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी लाखभर नागरिक प्रतिक्षेत आहेत. या नागरिकांना पहिला डोस घेऊन शंभर दिवस उलटले आहेत. परंतु लस उपलब्ध होत नसल्याने या नागरिकांना अजुन किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, हे सांगणे कठीण आहे.

महत्त्वाच्या बातम्या