गिरणी कामगार ते लोकसभा उमेदवार, मोहन जोशींचा प्रवास…

टीम महाराष्ट्र देशा : सोमवारी रात्री उशिरा कॉंग्रेसने पुणे लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला, यामध्ये बाजी मारली ती माजी आमदार मोहन जोशी यांनी. कॉंग्रेसतर्फे अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड, मोहन जोशी आणि सुरेखा पुणेकर यांची नावे शर्यतीत होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी मोहन जोशी यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसने पुणे मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु उमेदवार नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळालेला नव्हता. आता उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्याने पुण्यात भाजपचे गिरीश बापट विरुद्ध कॉंग्रेसचे मोहन जोशी असा सामना रंगणार आहे.

कोण आहेत मोहन जोशी ?

Loading...

मोहन जोशींचा जन्म ३ डिसेंबर १९५६ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण श्री शिवाजी मराठा हायस्कूलमधून झाले. १२ वी नंतर त्यांनी गिरणी कामगार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून स्थानीक वर्तमानपत्रात काम केले.

पत्रकारिता क्षेत्रात काम करताना त्यांचा संबंध कॉंग्रेसशी आला. कॉंग्रेसच्या विचारांनी प्रभावित होवून १९७२ साली त्यांनी पुणे युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर १८८७ साली ते महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बनले. याच बरोबर ते हरिजन सेवक संघाचे अध्यक्षही होते.

मोहन जोशींनी पुण्यातून १९९९ ला लोकसभा निवडणूक लढवली परंतु त्यात त्यांचा पराभव झाला होता. २००५ साली ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस होते. तर २००८ साली ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. या आणि इतरही अनेक राजकीय पदांवर त्यांनी काम केले आहे.