कॉसमॉस सहकारी बँकेची आर्थिक स्थिती उत्तम : अध्यक्ष मिलिंद काळे

टीम महाराष्ट्र देशा : एखाद्या चित्रपटाच्या शोभेल अशा पद्धतीने पुण्यातील कॉसमॉस बँकेवर हॅकर्सनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली होती, परदेशी हॅकर्सनी कॉसमॉस बँकेतील काही खाती हॅककरून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये हॉंगकॉंगच्या एका बँकेमध्ये वळते केले आहेत. मालवेअर व्हायरसचा वापर करून बँक ग्राहकांच्या व्हिसा आणि डेबिट कार्डची माहिती चोरण्यात आली, यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, ‘कॉसमॉस सहकारी बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यात बँकेच्या कोअर बँकिंग यंत्रणेवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे खातेदारांची खाती व माहितीही सुरक्षित आहे. आणि खातेदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी खातेदारांना केले आहे.

‘बँक दर वर्षी बँकेचा सर्व्हर व अन्य यंत्रणांचे सायबर ऑडिट करून घेत असते. बँकेचा सर्व्हर, स्वीच यंत्रणा, सीबीएस प्रणाली सर्व नामांकित कंपन्यांचे आहे. बँकेचा एकूण राखीव निधी १,६४६.२७ कोटी रूपये असून भागभांडवल ३५२.४७ कोटी रुपये असा बँकेकडे एकूण १,९९८.७४ कोटी रुपयांचा स्व-निधी आहे. ११२ वर्ष जुन्या बँकेच्या सात राज्यात १४० शाखा असून, बँकेचा एकूण व्यवसाय २५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

या घटनेचा बँकेच्या दैनंदिन व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही व होणार नाही, ‘असे काळे यांनी स्पष्ट केले. या सायबर हल्ला प्रकरणी बँकेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांचा तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही बँकेतर्फे सांगण्यात आले.

आरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी – कारणे आणि उपाय

उपकर्णधार अजिंक्य रहाणे शरद पवारांच्या भेटीला