मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे अटक पूर्व जामिन फेटाळला

पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचा अटक पूर्व जामिन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रहलाद भगुरे यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली.

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली प्रकरणी संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अॅट्रॉसिटी, खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदी कायदया अंतर्गत पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पुढे तपासासाठी हा गुन्हा शिरूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता.

या घटनेला २० दिवस उलटूनही एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याने राजकीय नेत्यांकडून सरकारवर टीका करण्यात येत होती. दरम्यान या दोघांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. दरम्यान आज एकबोटेंचा जमीन फेटाळण्यात आल्याने कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.