fbpx

एमआयडीसी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एक जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राज्याचे उद्योगमंत्री तथा एमआयडीसीचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक काल पार पडली. यामध्ये सर्वानुमते कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे एमआयडीसीला अंदाजे 130 कोटी रुपये अदा करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

प्रतिनियुक्तीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यावर यावेळी निर्णय घेण्यात आला. त्यांच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करण्याची शासनाला शिफारस केली जाणार आहे. इतर कर्मचाऱ्यांची थकबाकी एकरकमी रोख स्वरुपात देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या शिवाय महामंडळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान काम-समान वेतन या तत्त्वावर वेतनवाढ व इतर लाभ देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होऊन कार्यवाहीच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे ठरले आहे. दरम्यान, संचालक मंडळाने घेतलेला निर्णय राज्य शासनाला कळविण्यात येणार आहे.