जवानांना परवानगीशिवाय सोशल मीडिया वापरण्यास बंदी – गृहमंत्रालयाचे बंदी

 बीएसएफ, सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी व्हिडीओ पोस्ट करून वरिष्ठ अधिका-यांच्या छळाला वाचा फोडल्याने, देशभरात संतापाचे वातावरण आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावणा-या सैनिकांना मिळणा-या वागणुकीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून टीकाही करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे जवांनाच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ‘ पॅरामिलिट्री फोर्समधील जवानांना परवानगीशिवाय सोशल मीडिया वापरता येणार नाही’ असे आदेश गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत.  बीएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांचे व्हिडिओ लागोपाठ समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सावध पवित्रा घेतला आहे.
त्यामुळे यापुढे पॅरामिलिट्री फोर्समधील जवानांना ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यासारख्या सोशल मीडियांचा वापर संमतीशिवाय करता येईल. तसेच कुठलेही वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओही त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाहीत. जवानांना सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकायची असेल तर त्यापूर्वी त्यांना वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे, आदेश गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत.
जबहादूर यादव या जवानाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओत भ्रष्ट लष्करी अधिकाऱ्यामुळे मिळणारे निकृष्ट दर्जाचे अन्न आणि जवानांची केली जाणारी हेळसांड यांवर भाष्य केले होते. तसेच त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर लष्कराने त्या जवानालाच वेडा ठरवत त्याला प्लंबरचे काम दिल्याचे वृत्त आहे. तेजबहादूर यांदवने फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत, ‘सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा तर उपाशी झोपावं लागत, असल्याचं’ही या जवानाने म्हटले होते.  त्यानंतर बीएसएफने एक पत्रक काढून तेज बहादूर मानसिक रुग्ण असल्याचं स्पष्टीकरण दिलं. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
दरम्यान, तेजबहादूर यांच्यानंतर मथुरेतील सीआरपीएफच्या जवानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. जीत सिंह असं या जवानाचं नाव असून त्याने या व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आपल्या समस्या मांडल्या आहेत. जीत सिंह यांनी या व्हिडीओद्वारे लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांना मिळणाऱ्या सुविधांमधील तफावतीवर बोट ठेवलं आहे.