fbpx

विप्रोचे अझीम प्रेमजीची-मुख्यमंत्री भेट; शासनासोबत विधी सेवा क्षेत्रातील सामंजस्य करार

मुंबई : विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वांद्रे येथील एमएमआरडीएच्या कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी अनेक समाजोपयोगी प्रकल्पाबाबत चर्चा झाली. ‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन’अंतर्गत विप्रोतर्फे अझीम प्रेमजी फिलान्थ्रोपिक इनिशिएटिव्ह आणि महाराष्ट्र शासन यांच्यात विधी सेवा क्षेत्रातील सामंजस्य करार करण्यात आला.

या कराराद्वारे विप्रो आर्थिक दुर्बल घटकांसाठी कायदेशीर सेवा देण्याचे काम करणार आहे. यासाठी राज्यातील विधी महाविद्यालयांचा समावेश केला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विप्रोच्या या उपक्रमाचे स्वागत केले. गावामधील सामाजिक परिवर्तन प्रक्रियेत विप्रोने योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, बाल गुन्हेगारीतील सुधारात्मक उपाय आणि मुलांचे पुनर्वसन यासाठी चांगली सुविधा निर्माण करावी. यात आपण यशस्वी झाल्यास समाजासाठी उत्तम सेवा ठरणार आहे.

अझीम प्रेमजी फिलान्थ्रोपिक इनिशिएटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत उपाध्याय, उपाध्यक्ष शेख अन्वर, कार्यक्रम प्रमुख जेकब जॉन, सल्लागार अंबिका हिरानंदानी, गृह विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, तुरूंग महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपसचिव नारायण कऱ्हाड, डॉ. आनंद बंग यांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायतींमार्फत ४०० ऑनलाईन सेवा दिल्या जाणार

८६ कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी