देशातील सर्व राष्ट्रीय बँकांच्या प्रमुखांची औरंगाबादेत बैठक, अर्थ राज्यमंत्री डॉ. कराडांचा पुढाकार

Dr. Bhagwat Karad

औरंगाबाद : देशातील सर्व प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रमुखांची बैठक येत्या १६ सप्टेंबरला शहरात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजनांबाबत तसेच त्यात येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना आदी योजनांवर चर्चा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या बैठकीमध्ये यावरच चर्चा होणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

औरंगाबादच्या डीएमआयसीमध्ये सध्या उद्योग सुरू झाले असले तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जास्तीत जास्त उद्योगांनी औरंगाबादमध्ये गुंतवणूक वाढवावी या साठी उद्योग प्रतिनिधी आणि बँकांच्या प्रमुखांची बैठक घेणार असल्याचेही डॉ. कराड म्हणाले. या माध्यमातून औरंगाबादेत रोजगार निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या या बैठकीला देशातील बँकिग क्षेत्रातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या