रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा :  येत्या 23 जानेवारी रोजी मनसेचं पहिलंच अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरेंची भेट ही महत्वाची मानली जात आहे.

या भेटीनंतर महाअधिवेशनापूर्वी हर्षवर्धन जाधव पुन्हा घरवापसी करणार असल्याचं बोललं जात आहे. हर्षवर्धन जाधव हे याआधी मनसेच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले होते. पुढील आठवड्यात होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. हर्षवर्धन पाटील मनसेमध्ये पुनरागमन करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे.मनसेची साथ मिळाली तर त्यांना पुन्हा एकदा जोरदार वापसी करता येईल. हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. तसेच ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या भूमिकेत बदल करणार असल्याचे चिन्ह आहेत. राज ठाकरे भगवा झेंडा हाती घेणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे २३ जानेवारीला म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. २३ जानेवारीला मनसेच पहिलंच अधिवेशन होणार आहे.