मराठवाड्यात आज अमित शहा, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्या सभा

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच जोर धरू लागला आहे . यामुळे मराठवाड्यात होता दिग्गजांच्या सभा होत आहेत . गुरुवारी(ता.10) भाजपचे पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उस्मानाबादेत तर औरंगाबादेत उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा होणार आहे.

दोन दिवसापूर्वी झालेल्या दसरा मेळाव्यात अमित शाह यांनी बीड च्या सावरगाव (घाट) जोरदार भाषण केले. या कार्यक्रमात पंकजा मुंडेची जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. याच कार्यक्रमातून खर्या अर्थाने भाजपच्या प्रचाराचा नारळ दसऱ्याच्या मुहूर्तावर फुटला. त्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार तथा महायुतीचे अधिकुत उमेदवार राणा जगजितसिंह यांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा हे तूळजापूरात दुपारी तीन वाजता सभा घेणार आहे.

मुंबईतील दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण करत राज्याचे लक्ष वेधून घेतल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे गुरुवारी (ता.10) औरंगाबादेत दाखल होत आहेत. शिवसेनेचे वैजापूर, कन्नड आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांच्या जाहीर सभा होणार आहे. पश्चिममध्ये भाजपने केलेली बंडखोरी, गंगापूरच्या मानेंनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश, लोकसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार ठरलेले शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह शहरातील नागरी प्रश्नांवर उध्दव ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात युती झाल्यानंतर उध्दव ठाकरे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी निघाले आहेत. नगर जिल्ह्यातील दौरा संपवून गुरुवारी ते औरंगाबादेत येणार आहेत. दुपारी तीन वाजता वैजापूरात प्रा. रमेश बोरनारे, चार वाजता कन्नड येथे उदयसिंग राजपूत तर सायंकाळी 7 वाजता मध्यचे प्रदीप जैस्वाल यांच्यासाठी ते शहरात जाहीर सभा घेणार आहेत.

पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्या विरोधात भाजपचे राजू शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. तर कन्नड विधानसभा मतदारसंघात हषवर्धन जाधव पुन्हा एकदा शिवसेनेच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तर लोकसभा निवडणुकीत शहरातील कचरा, पाणी प्रश्नाचा फटका शिवसेनेला बसला होता. विधानसभा निवडणुकीत यावर युती कशी मात करणार? हा प्रश्न कायम असतांना उध्दव ठाकरे या विषयांना हात घालतात का? याकडेही सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.

यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्यचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे. अतिथी दिग्गजांच्या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या