fbpx

संरक्षण उत्पादन धोरणाबाबत मुख्यमंत्री आणि उद्योगपती यांच्यात बैठक

fadnavis

मुंबई : शासनाने तयार केलेल्या संरक्षण उत्पादन धोरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे आज बैठक संपन्न झाली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रारंभी संरक्षण उत्पादन धोरणाबाबतचे सादरीकरण करण्यात आले. या धोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे पुढच्या ५ वर्षात महाराष्ट्र हे विमान आणि संरक्षक उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनणार आहे.

या उद्योगामध्ये सुमारे २ अब्ज रुपयांची गुंतवणूक होणार असून उद्योगांमधून विविध प्रकारच्या एक लाख रोजगाराची निर्मिती होणार आहे. या उद्योगाद्वारे सुरक्षा वाहने, दंगल नियंत्रण साधने, शस्त्रास्त्रे, दारुगोळा, रणगाडे, नागरी विमानाचे सुटे भाग, लढाऊ विमानाचे सुटे भाग, विविध प्रकारच्या बंदुकांची निर्मिती करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर आणि औरंगाबाद येथे हे कारखाने उभारले जाणार असून महाराष्ट्रात अंबरनाथ, खडकी, देहू रोड, भंडारा, चंद्रपूर, वरणगाव,भुसावळ आणि अंबाझरी येथे यापूर्वीच शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा निर्मितीचे कारखाने सुरु आहेत.

या धोरणाचे उद्योजकांनी स्वागत केले असून या उद्योगाच्या उभारणीसाठी दळणवळणाची साधने उपलब्ध असणे, संरक्षण उत्पादक विषयक अभ्यासक्रम सुरु करणे, कुशल कामगार उपलब्ध असणे गरजेचे असल्याच्या सूचना उदयोगपतींनी केल्या. या सूचनांचे स्वागत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी करून त्याचा विचार धोरणात केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.