रोज मेळावे, रोज गर्दी; महेबूब शेख यांच्यावर ठाकरे सरकार एवढे मेहरबान का?

mehbub

चंद्रपूर : संपूर्ण देशावर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आहे. सर्वसामान्य जनतेने कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सरकारने घातलेले नियम स्वीकारले यामुळे अनेक संकटाना देखील जनतेला सामोरे जावे लागले असल्याचे पहायला मिळाले. तसेच सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारधील नेते, मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना काळात काळजी घेण्याचे आवाहन जनतेला करत आहेत.

महाराष्ट्राला सध्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. म्हणून राज्य सरकार तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना करत आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि महत्वाचे नेतेच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. काल चंद्रपूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या नियमांना हरताळ फासल्याचे देखील पहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून महेबूब शेख सातत्याने अशी गर्दी जमवून मेळावे घेत आहेत. परंतु सर्वसामान्यांवर लगेच कारवाईची बडगा उगरणाऱ्या सरकारने महेबूब शेख यांना काही खास सवलत दिली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात आणि मेळाव्यात मोठी गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः मंचावर होते. यावर या पार्श्वभूमीवर गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने मनाई करण्यात आली असून तसे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाहीत ही पक्षाची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. परंतु सध्या पक्षाचा आदेशच राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी केराच्या टोपलीत टाकला असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या