शिवरायांचे स्मारक अरबी समुद्राऐवजी प्रतापगडावर उभारावे – भिडे गुरुजी

रत्नागिरी : जेथे छत्रपती शिवाजी महाराजांची कोणतीही स्मृती नाही, तेथे म्हणजे अरबी समुद्रात त्यांचे भव्य स्मारक उभे केले जात आहे. यातून कोणतीही प्रेरणा मिळण्याची शक्यता नाही. त्यापेक्षा छत्रपतींनी जेथे अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या प्रतापगडावर स्मारक उभारावे. दहशतवादाला गाडण्यासाठी छत्रपती जगले व हिंदवी साम्राज्य उभे केले. तेवढे कार्य केले तर खरा हिंदुस्थान निर्माण होईल, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे येथील पटवर्धन हायस्कूलच्या पटांगणावर भिडे गुरुजींचे व्याख्यान झाले. शिवप्रतिष्ठानने ३२ मण सुवर्णसिंहासन निर्मितीचा संकल्प सोडला आहे. त्याच्या प्रचारासाठी भिडे गुरुजी ठिकठिकाणी दौरा करत आहेत. त्यानिमित्ताने ते आज रत्नागिरीत आले असता शिवरुद्रा ढोलपथकाने त्यांचे जंगी स्वागत केले. सदैव अनवाणी फिरणारे भिडे गुरुजी यांचे व्यासपीठावर आगमन होताच सार्‍यांनी त्यांना नमस्कार केला.

भिडे गुरुजी म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी एकदा सांगितले होते की महाराजांच्या स्मारकातून पर्यटनाला चालना मिळेल. राज्याचा जबाबदार मंत्री असे बोलतो, पण सार्‍यांनी टाळ्या वाजवल्या. कोणीही आक्षेप घेतला नाही, याचे मला वाईट वाटले. दहशतवादाला धर्म नसतो, अशी राजकीय नेत्यांची भाषा असते.

पण आजपर्यंतचा इतिहास सांगतो की इस्लाम आणि दहशतवाद सारखाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इस्लामी राज्यकर्ते, इंग्रज, डच, पोर्तुगीज अशा सार्‍या शक्तींविरोधात लढा उभारला, त्यांना मातीत गाडले आणि हिंदवी राज्य स्थापन केले. शिवरायांच्या या इतिहासापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे भिडे गुरुजींनी सांगितले.

Comments
Loading...