आयुर्वेदिक, युनानी वैद्यकीय व्यावसायिकांचा सोमवारी बंद

रत्नागिरी : आयुर्वेद आणि युनानी वैद्यकीय व्यावयिकांसाठी आणला जाणारा प्रस्तावित कायदा या व्यावसायिकांवर अन्यायकारक ठरणार असून तो लोकशाहीविरोधी असल्याने या प्रस्तावित कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी आणि प्रस्तावित विधेयकामध्ये आवश्यक ते बदल सरकारने करावेत, या मागणीसाठी येत्या सोमवारी (दि. ६ नोव्हेंबर) नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशनने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. सर्व आयुर्वेद व युनानी वैद्यकीय व्यावसायिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन, रत्नागिरीचे सरचिटणीस डॉ. मिलिंदकुमार कुळकर्णी यांनी या बंदविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारतीय चिकित्सा पद्धतीचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने निती आयोगाने एक मसुदा मांडला आहे. एनसीआयएसएम – २०१७ या विधेयकाच्या मसुद्यामध्ये अनेक गंभीर त्रुटी आहेत. हे बिल लोकशाहीविरोधी असून बीएएमएस आणि बीयूएमएस वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अवमानकारक असल्याने त्याच्या निषेधासाठी देशभर आमच्या संघटनेने एक दिवस दवाखाने, रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयुर्वेद व युनानी चिकित्सक गेल्या अनेक वर्षांपासून आपापल्या औषधांसोबत अ‍ॅलोपॅथी औषधांचा व त्यामधील नवनवीन संशोधनांचा वापर आपल्या व्यवसायात करत आलेले आहेत. राज्यात आयुर्वेद व युनानी वैद्यकीय व्यावसायिक, २ ईई (३) ऑफ द ड्रग्ज अ‍ॅण्ड कॉस्मेटिक अ‍ॅक्ट १९४० अंडर रूल १९४५ नुसार रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत. उपकलम ४ व ५ ऑफ कलम २५ ऑफ एमएमपी अ‍ॅक्ट १९६१ नुसार अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण व प्रशिक्षणानुसार आपल्या व्यवसायात अ‍ॅलोपॅथी औषधांचा वापर करण्यास पात्र ठरतात. यानुसार अ‍ॅलोपॅथीच्या आवश्यक त्या सर्व भागांचा समावेश अधिकृतरीत्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला असताना त्याचा विचार प्रस्तृत मसुद्यात नाही, ही गंभीर बाब आहे.

हा कायदा सध्या ज्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे, त्यानुसार मंजूर झाल्यास आमचे वैद्यकीय व्यवसाय धोक्यात येतील व त्याचबरोबर राज्याच्या ग्रामीण भागासह सर्वत्र पुरवली जाणारी वैद्यकीय सेवा प्रामुख्याने प्राथमिक व काही अंशी माध्यमिक आरोग्य व्यवस्था कायमस्वरूपी बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रस्तावित विधेयकाला विरोध दर्शविण्यास एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनदेखील डॉ. मिलिंदकुमार कुळकर्णी यांनी संघटनेच्या वतीने केले आहे.