उस्मानाबादेत होणार वैद्यकीय महाविद्यालय ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

usmanabad

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात वेद्यकीय महाविद्यालय असावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून उस्मानाबादकरांची मागणी होती. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाविद्यालयास मंजुरी मिळाल्याने शहरातील शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

उस्मानाबाद जिल्ह्यात मेडीकल कॉलेज असावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना याबाबतची चर्चा सुरू होती. मात्र त्याला मूर्त स्वरूप मिळाले नाही. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात जिल्हा प्रशासनाची २६.५ एकर जागा होती. ती जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर याला गती मिळण्याचे संकेत आले होते. त्यानुसार आता शहरात १०० विद्यार्थी क्षमता असलेले महाविद्यालय मंजूर करण्यात आले असून त्याला सलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळात निर्णय झाल्यानंतर महाआघाडीच्या वतीने शहरातील शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोश केला. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, राष्ट्रवादी तसेच शिवसेना, काँग्रेसचे नगरसेवक, शहरातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या