मेधाताई, हा असतो ‘स्टंट’, पुण्यात मराठा संघटनांकडून अनोखं आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चाकडून लोकप्रतिनिधीच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणल्याचे पडसाद आजही पहायला मिळत आहेत. कुलकर्णी यांच्या विधानाचा निषेध करत मराठा संघटनांकडून आज अनोख स्टंट आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी खरा ‘स्टंट’ कसा असतो हे दाखवलं आहे.

गेल्या आठवड्यात भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी, मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर केलं जाणार आंदोलन म्हणजे ‘स्टंट’ असल्याचं म्हंटल होत. ‘महाराष्ट्र देशा’ने ही बातमी प्रसिद्ध करताच पुणे तसेच राज्यभरात याचे पडसाद उमटले होते. कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले. यावेळी त्यांच्या मुलाने आंदोलकांना आरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान, आज अलका टॉकीज चौकात अनोख स्टंट आंदोलन करत मराठा संघटनांनी आ मेधा कुलकर्णी यांचा निषेध नोंदवला आहे. ‘लोकप्रतिनिधींनी आमचे प्रश्न सभागृहात मांडावे म्हणून आम्ही आंदोलन करत होतो. मात्र, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत असलेल्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी आमच्या आंदोलनाला स्टंट म्हणून संबोधले होते. त्यामुळे आंदोलन आणि स्टंट यांच्यात काय फरक असतो हे सांगण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं, यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून स्पष्ट करण्यात आलं.