आशिष शेलार ‘एमसीए’तून बाहेर

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनवर (एमसीए) देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे या दोघांची उच्च न्यायालयाने बुधवारी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या दोन्ही न्यायमूर्तीनी सूत्रे हाती घेताच मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना एमसीएच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले आहे.

लोढा समितीच्या शिफारशींचा अवलंब करण्यात वारंवार होत असलेल्या दिरंगाईबद्दल एमसीएला नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले होते. यामुळे ४ एप्रिलला उच्च न्यायालयाने गोखले आणि कानडे यांची एमसीएचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली. बुधवारी नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांनी एमसीएच्या उच्च अधिकाऱ्यांची भेटही घेतल्याचे माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार प्रशासकांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी शेलार यांची इच्छा जाणून घेतली. त्यावर शेलार यांनी एमसीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यापुढे निवडणुकीद्वारे नवीन कार्यकारणी समिती स्थापन होईपर्यंत प्रशासकच सर्व कारभार पाहतील़