Kaccha Limbu- स्पेशल आई बाबांसाठी कच्चा लिंबू चे स्पेशल गाणे!

ती पत्नी म्हणून एकमेकांसोबत एकरूप झालेल्या त्या दोघांचा बाळाच्या जन्मासोबत आई बाबा म्हणून जन्म होतो. आपल्या मुलाबरोबर मुल होऊन खेळणारे, चालायला शिकताना, रांगताना धडपडल्यावर सदैव मुलाच्या पाठीशी असणारे आई बाबा नंतर पुढे आयुष्याची लढाई लढतानासुद्धा आपल्या बाळाच्या पंखात बळ येईपर्यंत त्याच्या पाठीशी ठाम उभे असतात. पण काही मुलं ही ‘स्पेशल’ असतात, त्यांच्यातले मूलपण कधी संपताच नाही! या ‘स्पेशल’ मुलांना घडवणारे त्यांचे आई बाबा पण तितकेच स्पेशल असतात. अशाच ‘स्पेशल’ आई बाबांची कहाणी ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाच्या ‘माझे आई बाबा’ या गाण्यात सांगण्यात आली आहे.

कोणत्याही हिशोबाच्या पलीकडे असणाऱ्या या आई बाबांना शब्दांच्या कोंदणात बसवण्याचे आव्हान पेलले आहे कवी संदीप खरे यांनी. आणि या गाण्याचे साधे सरळ शब्द मनाला भिडण्याचे महत्वाचे कारण आहे तितकीच मनाला भिडणारी, साधी सरळ परंतु अतिशय हृदयस्पर्शी अशी चाल! ही चाल आहे सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी आणि हे गाणे गायले आहे अवधूत गुप्ते यांनी. आणि या गाण्याचे संगीत संयोजन केले आहे समीर म्हात्रे यांनी.

वैयक्तिकरीत्या दिग्दर्शित केलेला प्रसाद ओक यांचा पहिलाच चित्रपट, ट्रेलरमधून अनुभवायला मिळणारा सोनाली कुलकर्णी, रवी जाधव, मनमीत पेम, सचिन खेडेकर यांचा कसदार अभिनय, चित्रपटाचा लूक आणि प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारे ‘माझे आई बाबा’ हे गाणे यामुळे ‘कच्चा लिंबू’ ने रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वरूप रिक्रिएशन अँड मिडीया प्रा. लि. प्रस्तुत आणि मंदार देवस्थळी निर्मित ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.Loading…
Loading...