fbpx

काँग्रेसने दिलेल्या ‘गरीबी हटाओ’च्या नाऱ्याचं काय झालं ?,राहुल गांधींना मायावतींनी झापलं

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या निवडणुका जवळ येवू लागताच कॉंग्रेसला पुन्हा एकदा गरिबांची आठवण आली आहे. यामुळेच कॉंग्रेस सत्तेत आल्यास देशातील प्रत्येक गरिबाला किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना राबवली जाईल, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रायपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना दिले आहे.

देशातील गरिबी दूर करण्यासाठी आणि भूकबळी थांबवण्यासाठी काँग्रेसने किमान उत्पन्नाची हमी देण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. सत्तेत आल्यास हे वचन आम्ही निश्चितपणे पूर्ण करू, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींच्या या आश्वासनाची सोशल मिडीयावर चांगलीच खिल्ली उडवली जात असून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी देखील राहुल गांधी आणि कॉंग्रेसवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसने ‘गरीबी हटाओ’ ची घोषणा दिली होती. त्याचे काय झाले असा सवाल मायावती यांनी केला आहे.काँग्रेसने दिलेली अनेक आश्वासने आणि घोषणा हवेत विरली असून,राहुल यांनी जनतेला आश्वासने देण्याआधी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत असा सल्लाही मायावती यांनी दिला आहे.